प्रतिपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पापमोचनी एकादशी दिवशी, सोमवारी उभे रिंगण दिंडी सोहळ्यास भारत बटालियनने परवानगी नाकारल्याने पोलिस व ग्रामस्थ, वारकरी यांच्यात झटापट होऊन धक्काबुक्की झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जमावाला रोखताना काही पोलिस खाली पडले.
बँकांच्या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प
प्रशासनाचा विरोध झुगारून वारकर्यांनी भारत बटालियन मैदानावर पायी रिंगण व पालखी सोहळा पूर्ण केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यामुळे नंदवाळला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. गेले सात दिवस तेथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. मंदिर समितीने पायी दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा सोहळा भारत बटालियनला दिलेल्या जागेत होणार असल्याने त्याला भारत बटालियनने परवानगी नाकारली. त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरच उभे रिंगण सोहळा घेण्याचे मंदिर समितीने नियोजन केले.
सकाळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पालखी व अश्व पूजन करून दिंडी सोहळा सुरू झाला. दोन अश्वांनी रिंगण सोहळा केल्यानंतर पालखी सोहळा गावाशेजारील पादुका मंदिरासमोर विसाव्याला आला. चंद्रदीप नरके, भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील, तानाजी निकम, सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच सागर गुरव, कृष्णात पाटील यांच्यासह वारकरी, ग्रामस्थांनी भारत बटालियनविरोधात निषेध करत ठिय्या आंदोलन केले.