केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी भेट घेतली. रोहित पाटील यांनी या भेटीनंतरचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाराष्ट्र दिल्लीमध्ये असणे गरजेचे आहे, ह्या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेले काम झाले असे समज, हे वाक्य धीराचे असल्याचे रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नितीन गडकरी यांच्या कामाच्या शैलीचे केवळ भाजपच नाही तर विरोधी पक्षातील नेतेही फॅन आहेत. गडकरींच्या कामाचा असाच अनुभव रोहित पाटील यांनाही आला आणि ते भारावून गेले. त्यांनी त्यामुळेच नितीन गडकरी यांचे कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीबाबत माहिती घेऊन तिथे मिळालेल्या यशाबद्दल आपले अभिनंदन केल्याचेही रोहित पाटील यांनी म्हटले आहे. रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नागज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करुन दिला जावा आणि संबंधित रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा, अशी विनंती दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही काम होतील, अशी हमी दिली.