सातारा सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची मिळून 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रवीण शिवाजी मरगजे (रा. कानवडी,ता. खंडाळा) या तोतया सैन्य अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर दहिवडी व वडूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दहिवडी पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आपण सैन्यदलात असल्याचे सांगून आणि सैन्यातील अधिकाऱ्याचा बोगस गणवेश परिधान करून मरगजेने अनेकांना गंडा घातला आहे. सैन्यात भरती करण्यासाठी तो 9 लाख रुपये घेत होता. त्यातील काही रक्कम आधी व उर्वरित रक्कम भरती झाल्यावर घेतली जात होती. त्याने सचिन सुभाष खरात (रा. शिंदी बुद्रुक, ता. माण) यांच्याकडून 3 लाख 50 हजार , मनीष मनोज निकाळजे (रा. डांबेवाडी, ता. खटाव) यांच्याकडून 4 लाख 50 हजार व आप्पासाहेब भिकू जानकर (रा. शिंगाडवाडी,ता. खटाव) यांच्याकडून 7 लाख 60 हजार रुपये घेतले होते.
त्यानंतर सबंधित तरुणांनी सैन्यदलातील भरतीबाबत वारंवार विचारणा केली असता, मगरजेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सतत पाठपुरावा केल्यावर तरुणांना दमदाटी केल्याने, आपली फसवणूक झाल्याचे तिघांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या होत्या. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने संयुक्त कारवाई करून संशयिताला बेड्या ठोकल्या. सपोनि संतोष तासगावकर तपास करत आहेत.