लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सर्वानीच गंभीर भूमिका घेण्याची गरज आहे. आरोपी नात्यातील असेल तरी त्याची गय करता कामा नये, असा संदेश देणारा विशेष पोक्सो न्यायालयातील खटला समोर आला आहे. 13 वर्षांच्या मुलीवर तिच्या बापाने लैंगिक अत्याचार केला. पीडितेने तिच्यावरील अत्याचाराची आजीला कल्पना दिल्यानंतर आजीने मुलाविरोधातच लढा सुरु केला आणि अखेर मुलाला 25 वर्षे तुरुंगात पाठवले. विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 25 वर्षांच्या सश्रम कारावासा (Prison)ची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल देताना न्यायालयाने आजीचे कौतुक केले आहे.
60 वर्षांच्या आजीने स्वतःच्या नराधम मुलाविरोधात उभे राहून आपल्या 13 वर्षीय नातीचा बचाव करीत तिला न्याय मिळवून दिला. न्यायालयातील आजीच्या यशस्वी लढ्याचे विशेष पोक्सो न्यायालयासह सर्वत्र कौतुक होत आहे. आजीने तिच्या नातीवर बापाने क्रूररित्या अत्याचार केल्याचे ठोस पुरावे पोलिसांपुढे सादर केले. तिने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळे 37 वर्षीय आरोपीची 25 वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश भारती काळे यांनी हा महत्वपूर्ण निकाल देताना आजीचे कौतुक केले. नातीला न्याय मिळवून देण्यासाठी आजीने जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. भले या वयात आजीने तिच्या नातवंडांचा सांभाळ करणे ही जबाबदारी असली तरी तिने घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक झालेच पाहिजे, असे न्यायाधीश भारती काळे यांनी या खटल्यात निकाल देताना नमूद केले. आजीने नराधम वृत्ती ठेचून काढण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाचीही गय केली नाही. त्यामुळे हा खटला पोक्सो प्रकरणांत एक आदर्श उदाहरण ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया कायदेवर्तुळात व्यक्त केली जात आहे.