Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र'प्ले बॉय' बनायला गेला अन् १७ लाख गमावून बसला, तरुणाचा कारनामा

‘प्ले बॉय’ बनायला गेला अन् १७ लाख गमावून बसला, तरुणाचा कारनामा

कधी कोणाला कशाचा मोह किती महागात पडले हे काही सांगता येत नाही. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क प्ले बॉय होण्याच्या नादात एका तरुणाने एक नाही दोन नाही तर तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावले आहेत. शेवटी तेलही गेलं अन् तूपही गेलं अशी या तरुणाची अवस्था झाली आहे.

याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दयाशंकर मिश्रा, रागिणी, विक्रम सिंग व त्याचे साथीदार यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 जुलै ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण हा उच्चशिक्षित असून त्याचे बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सध्या तो बेरोजगार आहे. मुळचा तो सोलापूर जिल्ह्यातील असून, वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांचे निवृत्तीवेतन मिळाले होते. तेच पैसे आई सोबत खोटे बोलून शेअर मार्केट व इतर ठिकाणी गुंतवणूक करतो असे सांगून त्याने सायबर चोरट्यांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे. 25 जुलै 2021 रोजी फिर्यादी तरुणाला त्याच्या फेसबुकवर प्ले बॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी तसेच मेंबर होण्यासाठी इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिसेस या संकेतस्थळावर नोंदणी करा अशी जाहिरात दिसली होती. तसेच एक ते दोन तासांत अडीच ते तीन हजार रुपये कमवा असे प्रलोभनदेखील दाखविण्यात आले होते.

सायबर चोरट्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी तरुणाने दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणाला त्यांच्या जाळ्यात खेचून परवाना फी, खोली भाडे, पोलिस पडताळणी, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलिसीची रक्कम व त्याची लेट फी अशी विविध कारणे सांगून वेळोवेळी 17 लाख 38 हजार 822 रुपये भरण्यास सांगितले. तरुणानेदेखील सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे फोन पे द्वारे पैसे हवाली केले. दरम्यान, पैसे भरल्यानंतरदेखील कोणताच मोबदला मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणाला समजले. त्यानुसार त्याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -