ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ‘उत्तर’ कोणाकडे, याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडला हे शनिवारी (दि. 16) दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर चारच तासांत कोल्हापूरचे ‘उत्तर’ मिळणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 12) 61.19 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासह 15 उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र तितक्या चुरशीने मतदान झाले नाही.
शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाईल. त्यानंतर 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण 26 फेर्या होतील. यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.
मतमोजणीसाठी टेबलवर 45 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह राखीव आणि अन्य असे एकूण 125 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचार्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे, रंजना बिचकर, अर्चना कापसे उपस्थित होते.