गेल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकरचा मुद्दा खूपच गाजत आहे. अशामध्ये मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकरच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे मुंबईमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी असणार आहे. जर या वेळेमध्ये लाऊडस्पीकर वाजवले तर मुंबई पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांनी बुधवारी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. सायलेंट झोनमध्ये (Silent Zone) कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसणार आहे. या व्यतिरिक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसणार आहे. जर कोणीही दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आणि सांगितलेल्या वेळेमध्ये लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजेच धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही खासगी कार्यक्रम असतो, दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काही आदेश दिले आहेत. या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक टीम तयार केली आहे. जर लाऊडस्पीकर किंवा भोंगा वाजवण्यासंदर्भात कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
खाली दिलेल्या नियमांची होणार अंमलबाजवणी –
अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत. पण ज्या मशिदी आणि मंदिरे बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देताना मुंबई पोलिस रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करणार आहे.
ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत. त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी असेल. यासोबतच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की, नाही हे देखील पाहिले जाणार आहे.