लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने रविवारी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाबाद 103 धावा करत मोसमातील दुसरे शतक झळकावले. मात्र, विजयी शतक फटकावूनही राहुलसाठी (KL Rahul) एक वाईट बातमी आली आहे. त्याच्यावर आयपीएलमध्ये एका सामन्याची बंदी घातली जाण्याचा धोका दिसत आहे. या सामन्यात लखनौ संघाने 168 धावा केल्या, तर दुसरीकडे दमदार नेतृत्व करत मुंबईला केवळ 132 धावांवर रोखले आणि सामना 36 धावांनी जिंकला.
खरे तर, यंदाच्या आयपीएल हंगामात राहुल (KL Rahul) दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्याशिवाय संघातील इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलसाठी सर्वात मोठी वाईट बातमी म्हणजे चालू हंगामात तो पुन्हा एकदा तो स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळला तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाईल.
राहुलवर यंदाच्या आयपीएल हंगामात तीनवेळा दंडात्मक कारवाई झाली आहे. मुंबईविरुद्ध 16 एप्रिलला खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्याला पहिल्यांदा 12 लाखांचा दंड भरावा लागला होता. त्या सामन्यातही राहुलने नाबाद शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर लखनौचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध पराभूत झाला. आणि त्या सामन्यात राहुल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. या कारणामुळे राहुलला मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागला. आता पुन्ह एकदा मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सच्या टीमने टीम डेव्हिडला 8.25 कोटींमध्ये हार्दिक पांड्याच्या जागी टीमचा भाग बनवला. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे जयदेव उनाडकटला 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळाली, जो इतका चांगला फलंदाज नाही. चांगला अष्टपैलू पर्याय नसल्यामुळे मुंबईला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. पोलार्ड वगळता अव्वल सहापैकी एकही फलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे मुंबईला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 गोलंदाजांना मजबुरीने घ्यावे लागले आहे. खेळाडूंच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव हे मुंबईच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण ठरले आहे.