भोंग्यांचे नव्हे तर राज्यातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शुक्रवारी (दि. २९) रोजी धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस मदत केंद्राला भेट देऊन तेथील जवानांशी संवाद साधला. त्यानंतर गडचिरोलीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते.
राज्यातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, भोंग्यांचा प्रश्न नाही, असे अजित पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. भाजप आणि मनसेच्या भविष्यातील युतीसंदर्भात ते म्हणाले की, सत्तेसाठी अशा आघाड्या अनेकदा होत असतात. परंतु, त्या फार काळ टिकत नाहीत. अलीकडेच शासनाने मोहफुलांपासून मद्यनिर्मितीला मान्यता दिली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात येणार नाही. मात्र, मोहफुलांवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी स्थानिकांपैकी कुणी पुढे आल्यास सरकार त्यास नक्की मदत करेल, असे सांगितले.
अनेक अडचणींना तोंड देत नक्षलग्रस्त भागातील जवान काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या ६० टक्के आणि राज्य सरकारच्या ४० टक्के निधीतून जिल्ह्यात पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात येईल. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नागरिकांची हत्या झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहितीही पवार यांनी यावेळी दिली.