सर्वांसाठी दीर्घायुष्य या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालय कोल्हापूर आणि आरोग्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज “सार्वत्रिक लसीकरणाचे महत्व” या विषयावर एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे म्हणाले की”1978 साली सुरु झालेला लसीकरणाचा कार्यक्रम आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. सुरुवातीला ओळख असलेल्या सहा जीवघेण्या आजारांपासून सुरुवात करत आपण नवनवीन आजारांविरुद्ध बालकांना लसीद्वारे संरक्षण पुरवित आहोत.”
योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी लस देण्याचे महत्त्व सांगताना डॉक्टर साळे म्हणाले की शरीरावर लस दिलेल्या जागेवरून आरोग्य कर्मचारी कुठली लस द्यायची राहिली आहे हे ओळखू शकतो तसेच लसींचे वेळापत्रक पाळणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे”
पुढे बोलताना डॉक्टर साळे म्हणाले की “जरी नागरिकांचा वैद्यकीय सेवा घेताना खाजगी रुग्णालयांकडे ओढा असला तरी लसीकरणावेळी ते शासकीय आरोग्य केंद्रांना प्राधान्य देतात ही गोष्ट जनतेचा शासकीय लसीकरण यंत्रणेवरील विश्वास दाखवते. आपण हा विश्वास सार्थ करताना 100% लसीकरणाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कारण लसीविना राहिलेले एक मुल देखील संसर्गजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करू शकते, तसेच दोन गावांच्या हद्दीवर असणारी लोकसंख्या देखील लसीकरणातून सुटणार नाही यावर आपण लक्ष दिले पाहिजे.”
यावेळी डॉक्टर साळे यांनी कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागाशी संपर्क असलेल्या जिल्ह्यामध्ये जनजागृतीसाठी लोककला तसेच लोककलाकारांच्या प्रभावी वापराचे महत्व नमूद केले आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोसारख्या केंद्र सरकारच्या तळागाळातील जनतेशी संपर्क राखणाऱ्या विभागांना या कामी मदत करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील लसीकरणाच्या प्रगतीविषयी माहिती देताना जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी कोविड लसीकरणाचा जिल्ह्यातील प्रवास आणि आरोग्य यंत्रणेला जाणवणारी आव्हाने याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. देसाई यांनी समाज माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांमुळे लसीकरणाच्या प्रसारात कसे अडथळे तयार होतात ते सांगून यावेळी माहिती शिक्षण आणि संवाद या यंत्रणेचे महत्त्व विशद केले. जिल्ह्यात पात्र लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांचे लसीकरण झालेले असताना उरलेल्या दहा टक्के लोकांपर्यंत पोहोचताना जाणवणाऱ्या अडथळ्यांविषयी डॉक्टर देसाई यांनी माहिती दिली. तसेच 15 ते 17 वयोगटातील शालेय मुले सुट्टीमुळे गावी गेली असताना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान देखील नमूद केले. 18 वर्षावरील 97 टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉक्टर देसाई यांनी यावेळी दिली
यावेळी बोलताना कोल्हापूरच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील यांनी लसीकरणाच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि लोकांमध्ये लसीकरणाविषयी सकारात्मक आणि उत्साहाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना येणारे अनुभव यावेळी विशद केले.
श्रीमती पाटील पुढे म्हणाल्या की “एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत एकूण 6 सेवांपैकी लसीकरण एक महत्त्वाची सेवा अंगणवाडी सेविकांद्वारे पुरवली जाते. लसीकरण चुकलेल्या बालकांचा मागोवा घेऊन त्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे”
यावेळी प्रास्ताविक करताना प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या की “केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालय केंद्र सरकारच्या विविध योजना आणि जनजागृती संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आज संपूर्ण जग कोविडच्या महामारीशी झुंज देत असताना, भारतातील कोविडमुळे जीवित हानी इतर देशांच्या तुलनेत कमी आहे आणि याचे श्रेय आपल्या लसीकरणाच्या प्रयत्नांना जाते.