मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असणारे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जे. जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांचे सलाईन काढून डिस्चार्ज पेपरवर जबरदस्तीने सही करवून घेण्यात आल्याचा आरोप मलिक यांच्या वकिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. याबाबत अॅड. निलेश भोसले यांनी मुंबई सत्र न्यायालयात खुलासा केला आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी रूग्णालयात येऊन मलिक यांचा जबरदस्तीने डॉक्टरांकडून डिस्चार्ज करवून घेतला. कोणतीही पूर्वसुचना न देता त्यांची सलाईन सुरू असताना सलाईन काढून पेपरवर सही घेण्यात आली, असा धक्कादायक आरोप वकिलांनी केला आहे. रूग्णालयात त्यांना पाण्याची बाटली देण्यातही हलगर्जीपण करण्यात आला. अद्यापही ईडीने मलिक यांना आरोपपत्राची प्रतही देण्यात आलेली नाही, असेही वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, निलेश भोसले यांनी न्यायालयाने या आरोपासंदर्भात योग्य ते निर्देश ईडीला देण्यात यावेत, अशी विनंती न्यायालयासमोर केली.
दरम्यान, मलिक यांना जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये बंदिस्त होते. तेथून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पोटात दुखत असल्याने त्यांच्यावर आता अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असून त्यांचा रक्तदाब स्थिर नाही. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जेजे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.
मलिक यांची प्रकृती खालावली असल्याने मानवतावादी आधारावर अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी मागणी करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या जामिनाला विरोध करणार असल्याचे ईडीच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अगोदर का देण्यात आली नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा फेटाळून लावली आहे. ही केस प्रारंभिक टप्प्यावर असून त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.