मे महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या तापमानामुळे (Heat Wave) सर्वजण हैराण झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे सर्वजण पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये उकाड्याने त्रस्त महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अंदमानमध्ये 16 मेपासून मान्सून पाऊस सुरू झाला आहे. केरळमध्ये मान्सून 27 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतरच तो महाराष्ट्रात कधीपर्यंत दाखल होईल याची नेमकी तारीख सांगता येईल.
अनुराग कश्यपी यांनी पुढे सांगितले की, ‘ महाराष्ट्रात 26 मे ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस पडेल अशी आशा आहे. 20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 26 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. मान्सूनचा विषुववृत्त प्रवाह मजबूत आहे आणि तो वेळेवर पोहोचेल अशी आशा आहे. राज्यात मान्सूनची सुरुवात दरवर्षीच्या तारखांच्या आसपास असली तरी सुद्धा राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस लवकरच सुरू होईल