ताजी बातमी ऑनलाईन टीम
नागपूर ; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Sahitya Sammelan) आयोजन वर्धा येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी आज (दि.२९) पत्रकार परिषदेत केली.
उदगीर येथे एप्रिल २०२२ मध्ये पार पडलेल्या ९५ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर (Sahitya Sammelan) आता पुढील संमेलन कुठे होणार याबद्दल साहित्य वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. विदर्भ साहित्य संघाचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्ती केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचविले होते.
या संदर्भात माहिती देताना उषा तांबे म्हणाल्या, महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धेला भेट दिली. तेथील मैदाने, वाहनतळ, पुस्तक प्रदर्शनांचे स्थळ आणि निवास व्यवस्था यांची पाहणी केली. ९६ व्या अखिल भारतीय संमेलनासाठी वर्धा हे स्थळ योग्य असल्याचा अहवाल स्थळ निवड समितीने रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत दिला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.