ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली – महागाईच्या वणव्यात आणखी एक चिंताजनक बातमी आहे. एलपीजी सिलिंडरचे दर येत्या १ जूनपासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी हे दर ११०० रुपयांच्या पुढे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गॅसच्या कंपन्या दर महिन्यात एक तारखेला दरनिश्चिती करतात. त्यामुळे एक तारखेला याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करताना सिलिडरच्या सबसिडीबाबतही निर्णय जाहीर केला होता. केंद्र सरकारने १२ सिलिंडरसाठी २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिलिंडरचे दर कमी होताना दिसत नाहीयेत. आता ही दरवाढ झाल्यास सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास सहन कारावा लागणार असल्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सावधगिरीची उपाययोजना म्हणून या वेळेचा गॅस सिलिंडर ३१ तारखेच्या आतच बुक करावा, तूर्तास एवढाच पर्याय ग्राहकांच्या हाती आहे.
कसे ठरतात गॅस सिलिंडरचे दर
भारतातील गॅसचा पुरवठा हा निर्यातीवर अवलंबून आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारीतल किमतीनुसार हे दर निश्चित केले जातात. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणामही गेल्या काही काळात इंधन आणि गॅसच्या किमतीवर झालेला दिसतो आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या कोणत्या दराला एलपीजीची विक्री करतात त्यावर एलपीजी गॅसचे दर अवलंबून असतात. या मूळ किमतीवर देशात कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च आणि विमा यासारख्या इतर घटकांचाही भार वाढतो.