ताजी बातमी ऑनलाईन टीम
मोरेवाडी (ता.पन्हाळा) येथे कुंभी नदीमध्ये पोहायला गेलेला सम्राट सचिन मोरे (वय ९) हा शाळकरी मुलगा बुडाला. ही घटना सोमवारी (दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सम्राट हा इयत्ता ३ री मध्ये शिकत होता. उन्हाळी सुट्टीमुळे तो त्याचा चुलत भाऊ श्रेयस पंडित मोरे याच्याबरोबर पाणवठ्यावर पोहायला गेला होता. या दोघांनाही पोहता येत नसल्याने पोहायला शिकण्यासाठी ते गेले होते. नदीकाठी पोहून झाल्यावर श्रेयस पाण्यातून बाहेर येवून कपडे घालत असताना सम्राट पाण्यातच पोहत थांबला होता. अचानक सम्राट पाण्यातून वाहत जाऊन काही अंतरावर बुडाला. श्रेयसने आरडाओरडा केला करून मदतीसाठी आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. पण काही उपयोग झाला नाही.
कळे पोलिस ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री नऊ वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती. परंतु मृतदेह सापडला नाही. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली
आहे.