राज्यावर असलेले कोरोनाचे (Corona Virus) सावट अद्याप दूर झाले नाही. आजपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) कमी होत असल्याने सरकारसोबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. पण आता कोरोनाने पुन्हा सर्वांची चिंता वाढवली आहे. राज्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारही सतर्क झाले आहे. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashrea Deputy CM Ajit Pawar) यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही काळजीची बाब आहे. राज्य सरकारचे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली तर विचार करावा लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसंच, मागचा अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची चौथी लाट येतेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. बुधवारी राज्यात 1081 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या हजारांपार गेली आहे. मुंबईत मंगळवारी 739 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या तीन दिवसांत दुप्पट झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर टास्कफोर्स लक्ष ठेऊन असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.