ताजी बातमी ऑनलाईन टीम
बांगलादेशमधील चितगावच्या शितकुंडा येथील एका शिपिंग कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जवळपास 450 जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले आहेत.
जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आग्नेय बांगलादेशातील एका खाजगी कंटेनर डेपोला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री चट्टोग्राममधील बीएम कंटेनर डेपोला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह लष्कराला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी नुरुल अलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच, रात्री साधारण 9 वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला.