ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : लॉकडाऊननंतर अंबाबाईचे मंदिर उघडले तरी टेंडरच्या लालफितीत लाडू अडकल्याने भाविकांना लाडू प्रसादाविनाच रिकाम्या हाती परतावे लागले. आता रविवार, दि. 19 पासून भाविकांच्या हाती हा लाडू प्रसाद पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूचा ठेका कळंबा कारागृहाकडे आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर मागील काही वर्षांपासून कारागृहातून प्रसादाचा लाडू तयार होतो. ही लाडू विक्रीची साखळी मध्यंतरी पत्रव्यवहार आणि टेंडरच्या कामकाजाने विस्कळीत झाली. अखेर देवस्थानकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत प्राथमिक स्वरूपात 200 ते अडीचशे लाडूंची पहिली ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानुसार उद्यापासूनच या प्रसादाच्या लाडूंची विक्री केली जाणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. दुसरीकडे देवीच्?या प्रसादाचा लाडू तयार करण्यासाठी कळंबा कारागृहातील पुरुष आणि महिला कैद्यांची टिम झपाट्याने काम करत आहे. कोणी बुंदी पाडते, तर कोणी पाकात कळ्या , काजू, बेदाणे, वेलची टाकून लाडूची लज्लत वाढवते, तर कुठे लाडू वळले जात आहेत, तर कुठे त्?याचे पॅकिंग केले जात
आहे.
देवीचे दर्शन घेतल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद हा लाडू प्रसाद करताना मिळतो. आयुष्यातील आत्मिक समाधान देणारे हे काम कायमस्वरूपी मिळावे. गजाआडच्या जगात देवीच्या सेवेचा प्रसाद आम्हाला मिळतोय, यातच समाधान आहे, अशी भावना प्रसाद तयार करणाऱ्या कैद्यांनी व्यक्त केली.
देवीच्या प्रसादाचा लाडू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यामध्ये वापरण्यात येणारे घटक यांचा दर्जा तपासला जातो. लाडू तयार झाल्यानंतर तो खाण्यासाठी योग्य आहे का, याची चाचणी तज्ज्ञांकडून करण्यात येते आणि मगच प्रसादाच्या लाडूंचे पुढे वितरण करण्यात येते. याच पद्धतीनुसार देवस्थान समितीकडून पत्रव्यवहार सुरू असतानाच अंतिम ऑर्डर येण्यापूर्वीच सॅम्पलचे 100 लाडू तयार केले आहेत.