ताजी बातमी ऑनलाईन टीम
लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. या दरम्यान भारतीय वायुसेनेने ‘अग्निवीर’ भरतीसाठी तपशील जारी केला आहे. या सेवेशी संबंधित सर्व माहिती आयएएफने जारी केलेल्या या निवेदनात देण्यात आली आहे. ‘अग्निपथ’ योजनेद्वारे सैन्यात सामील होण्यासाठी ‘अग्निवीर’ची पात्रता काय असावी? त्याचा पगार किती असेल? त्यांना किती रजा मिळणार आणि त्यांचे प्रशिक्षण कसे होणार? याशिवाय युवकांना मिळणाऱ्या भत्त्यांचीही माहिती या तपशीलात देण्यात आली आहे.
24 जूनपासून सुरू होणार निवड प्रक्रिया
येत्या 24 जूनपासून हवाई दलातील निवड प्रक्रिया सुरू होत आहे. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय तरुण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. यासाठी त्याला प्रथम वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. पहिल्या वर्षासाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे ठेवण्यात आली आहे. ‘अग्निवीरांना’ वर्षभरात 30 सुट्या मिळणार आहेत, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय रजाही देण्यात येणार आहेत.
चार वर्षांसाठी असेल नोकरी
हवाई दलाने जारी केलेल्या तपशिलानुसार ‘अग्निवीरां’ची भरती वायुसेना कायदा 1950 अंतर्गत 4 वर्षांसाठी असेल. हवाई दलात अग्निवीरांची वेगळी रँक असेल आणि ती सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल. अग्निपथ योजनेच्या सर्व अटींचे अग्निवीरांना पालन करावे लागेल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25% अग्निवीरांना नियमित सेवेत समाविष्ट करून घेतले जाईल. या 25 टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवेतील कामगिरीच्या आधारे निश्चित केली जाईल.