‘जल जीवन मिशन’ योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामास बहुतांशी गावांमध्ये प्रारंभ झाला आहे. ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बीदवाक्याप्रमाणे पाणी पोहोचविण्यासाठी हे मिशन गावोगावी यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेची कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. याकडे ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिल्या.
शिरसगाव (ता. कडेगाव) येथे ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत 74.68 लाख रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
ना. डॉ. कदम म्हणाले ‘जल जीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. याप्रमाणे जिल्ह्यात आणि पलूस- कडेगाव मतदार संघातही चांगले काम सुरू आहे. सर्व संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत यांनी योजना यशस्वीरीत्या राबविण्याकरिता समन्वयाने चांगले काम करावे.
सरपंच सुप्रिया राहुल मांडके, उपसरपंच किशोर पवार , माजी सरपंच दिलीप पवार, एकनाथ पवार, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम कुंभार, माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.