एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. हे सरकार वाचवण्यासाठी आता महाविकासआघाडीचे जनक शरद पवार मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना सर्वात आधी महाराष्ट्रात येऊ द्या,असंतोष तयार करून आमदार वळवता येतात का ते तपासा आणि तोपर्यंत तांत्रिक मुद्द्यांवर पेच वाढवत न्या, असा सल्ला शरद पवारांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादानंतरही आज सकाळी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल जोरदार शक्तीप्रदर्शन करत वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये आले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना (Shivsena) आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने मला समोर येऊन सांगावं, मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. केवळ मुख्यमंत्रीपदच नाही, तर मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देण्यास तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.