एमपीएससी परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महात्वाचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. एमपीएससीने परीक्षेसंदर्भात जो निर्णय घेतला आहे तो 2023 मधील मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (Pre and Main Examination Syllabus) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याची घोषणा आयोगाने केली आहे.
लोकसेवा आयोगाने पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय एमपीएससीने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येणार आहे. तर राज्या सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू असेल.
नव्या नियमानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी 300 मार्कांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 मार्कांसाठी असतील. तर मुलाखतीसाठी 275 गुण असतील. या पद्धतीने एकूण गुण 2 हजार 25 मार्कांची ही परीक्षा असेल. त्याचबरोबर एकूण 24 वैकल्पिक विषयातून उमेदवारांना एक विषय निवडता येईल. या विषयांची यादी देखील आयोगाने जाहीर केली आहे.