ताजी बातमी ऑनलाईन टीम
आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत पोहचलेल्या निर्मला सीतारामन यांचा 18 ऑगस्ट रोजी 61 वा वाढदिवस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी मेहनतीच्या जोरावर सेल्स गर्ल ते देशाची अर्थमंत्री होण्यापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. निर्मला सीतारामन या देशातील पहिल्या महिला आहेत ज्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे 1970-71 या काळात अर्थमंत्रालयाचा कार्यभार होता, परंतु तो अतिरिक्त कार्यभार म्हणून होता. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या विषयी अधिक माहिती.
निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील नारायण सीतारामन हे रेल्वेत नोकरी करत होते. तर आई सावित्री सीतारामन या गृहिणी होत्या. निर्मला सीतारामन यांचे प्राथमिक शिक्षण चेन्नई आणि तिरुचिरापल्ली येथे झाले. 1980 मध्ये, त्यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर निर्मला सीतारामन दिल्लीत आल्या आणि त्यांनी 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.
सेल्स गर्ल म्हणून केलं काम
निर्मला सीतारामन ह्या जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची भेट परकला प्रभाकर यांच्याशी झाली. परकला प्रभाकर यांच्या कुटुंबात अनेक काँग्रेस नेते होते. तर परकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे संपर्क सल्लागार म्हणूनही काम केले. निर्मला यांनी 1986 मध्ये परकला प्रभाकर यांच्याशी लग्न केले आणि त्या लंडनला गेले. लंडनला येऊन त्यांनी प्राइस वॉटरहाऊस येथे संशोधन आणि विश्लेषणामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. या ठिकाणी रुजू होण्यापूर्वी त्यांनी काही दिवस लंडनच्या रीजेंट स्ट्रीट येथील होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केले. 1991 मध्ये त्या भारतात परतल्या आणि हैदराबादमध्ये सार्वजनिक धोरणात उपसंचालकपदही त्यांनी काही काळ सांभाळले. त्यांनी लंडनमध्ये बीबीसी वर्ल्डमध्येही काम केले आहे.