जिह्यात आठवडेभरात पावसाचा जोर कमी-अधिक झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत आता सात ते आठ फुटांनी घट झाली आहे. राधानगरी धरणातून 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, पंचगंगेच्या पातळीत घट होत असल्याने यंदा दुसऱ्यांदा पुराचा धोका टळल्याचे दिलासादायक चित्र आहे.
सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 34 फुटांवर आली होती. तर, 31 बंधारे पाण्याखाली होते.
कोल्हापूर जिह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र आज दिवसभर पावसाचा जोर कमी-अधिक असला तरी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी काही काळ पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास राधानगरी धरणाचा उघडलेला सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आज सायंकाळी उशिरापर्यंत उघडलेलाच होता. धरणातून एकूण 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. 43 फूट या धोका पातळीपासून अवघ्या एक फूट कमी अंतरावर असलेल्या पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी आज सायंकाळी 34 फुटांवर आली होती. सहाच्या सुमारासही ती 34 फुटांवरच स्थिर होती.