कोल्हापूर विमानसेवेच्या कक्षा आणखी वाढणार आहेत. विमानतळ (Airport) जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज झाले आहे. येत्या मार्च 2023 पर्यंत म्हणजेच सात महिन्यांत विमानतळाची नवी टर्मिनस इमारत कार्यरत होणार आहे. या इमारतीचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. जागतिक दर्जाच्या या नव्या टर्मिनलमुळे हे औद्योगिक शहर अधिक उत्तम प्रकारे इतर भागांशी जोडले जाईल आणि त्यामुळे या भागातील उद्योग, पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास भारतीय विमानतळ प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरद़ृष्टीने कोल्हापुरात विमानतळ उभारला गेला. नुसती उभारणी झाली नाही तर जानेवारी 1939 मध्ये या विमानतळावरून कोल्हापूर-मुंबई व्हाया पुणे अशी विमानसेवाही सुरू झाली होती. सुमारे 80 वर्षांनंतर कोल्हापूरच्या विमानतळाने पुन्हा झेप घेतली आहे.
जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज
कोल्हापूरचे विमानतळ जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज आहे. विमानतळ (Airport) सध्या वर्ग चार या श्रेणीत आहे. 1970 मीटर लांबीची धावपट्टी (2300 मीटरपर्यंत विस्तार सुरू) नाईट लँडिंग, एकाच वेळी पाच विमानांचे पार्किंग करता येणारे दोन अॅप्रन, दोन टॅक्सी वे, आयसोलेशन बे, पापी, आएफआर, आयएलएस, अॅटोमेटिक वेदर स्टेशन, रनवे एंड सेफ्टी एरिया, हाय फ्रिक्वेन्सी लाईट, अत्याधुनिक फायर फायटर आदी सुविधांनी सज्ज आहे.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन होणार
टर्मिनल इमारतीच्या अंतर्भागात स्थानिक संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडविणार्या कला आणि संस्कृतीचे दर्शन होईल. कोल्हापूर परिसरातील राजवाडा, भवानी मंडप तसेच कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला यांसारख्या सांस्कृतिक वारसा जपणार्या वास्तूंचा प्रभाव असलेल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन उभारण्यात आलेल्या मोठ्या कमानी नव्या टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावर बसविण्यात येणार आहेत.
300 प्रवाशांसाठी नवी टर्मिनस इमारत
नवी टर्मिनल इमारत 4 हजार चौरस मीटर परिसरात उभारण्यात येत आहे. एकाच वेळी 300 प्रवाशांसाठी आवश्यक प्रक्रिया हाताळणे या इमारतीत शक्य होणार आहे. या टर्मिनलमध्ये 10 चेक-इन काऊंटर्ससह प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा असतील. या इमारतीला शाश्वत सुविधांसह ऊर्जा बचत करणार्या इमारतींच्या ‘गृह’ या मानदंडानुसार चार तारांकित दर्जा मिळालेला आहे.
नवीन वाहतूक नियंत्रण कक्ष; पार्किंग व्यवस्था
एअरसाईड सुविधांच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, येथे भविष्यात वाढणार्या हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. हे काम येत्या सहा-सात महिन्यात पूर्ण होईल. या विमानतळ परिसरात 110 गाड्या तसेच 10 बस थांबू शकतील, अशी पार्किंग व्यवस्थाही करण्यात येत आहे. त्याचेही काम 70 टक्के पूर्ण झाले आहे.