काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांच्या एका सभेचा व्हिडिओ समोर आला असून सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी मुसळधार पावसामध्ये भाषण केले. हे भाषण करत राहुल गांधी यांनी मैदान गाजवले आहे. कर्नाटकातील (Karnataka) म्हैसुरमध्ये राहुल गांधी यांनी भाषण केले. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी राहुल गांधींची तुलना शरद पवारांशी (Sharad Pawar) केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेल्या भाषणाच्या आठवणी आजही सर्वांच्या लक्षात आहेत. 2019 मधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी धो-धो पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या मतदार संघामध्ये भर पावसात भाषण केले होते. त्यांचे हे भाषण खूप दिवस चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या भरपावसातील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
शरद पवारांनी भर पावसामध्ये केलेल्या भाषणानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भर पावसात भाषण केल्याने ते चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने कुठलाही अडथळा ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकत नाही, असे कॅप्शन देण्यात आले आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीतून सुरू झालेली ही यात्रा सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेद्वारे ‘भारताला एकजूट करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.’, असा संदेश पोस्टद्वारे काँग्रेसने दिला आहे. महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.