राज्यातील फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान आता चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (cm eknath shinde) सहीच्या माध्यमातून तरुणांनी कोट्यवधींची कमाई केल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणांनी मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी (cm fake signature) करुन एकाची आर्थिक फसवणूक केली. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप दाखवून तरुणांनी एकाला फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवले. यामध्ये पालघरमधील (Palghar) एका व्यक्तीची तब्बल 1.31 कोटी रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आता दोन तरुणांविरोधांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पालघरमधील स्टेशनरी दुकानाचे मालक जिग्नेश गोपानी (50 वर्षे) यांची दोन तरुणांकडून फसवणूक झाली आहे. जतीन पवार आणि शुभम वर्मा अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघंही वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारचे ई-पोर्टल फ्रँचायझीमध्ये सुरु करणार आहेत. यामध्ये हिस्सेदारी देऊ असे गोपानी यांना सांगण्यात आले. यासाठी त्यांच्याकडून फी म्हणून एक लाख रुपये मागण्यात आले. दोघांनीही सारख्याच वेळा घेतल्या आणि काम सुरू होईल अशी ग्वाही दिली. दोघांनी गोपनींकडून एकूण एक कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले होते.
सही पाहून संशय आल्याने पोलिसात धाव
25 ऑगस्टला आरोपींकडून गोपानी यांना ई-पोर्टल फ्रँचायझीसाठी परवाना, परमिट आणि इतर काही फीस भरल्याची स्लिप देण्यात आली. या स्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव आणि स्वाक्षरी होती. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी इंग्रजीमध्ये होती. मात्र त्यांना या स्वाक्षरीवर संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. यावेळी वालिव पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी एफआयआर नोंदवला आहे. यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी हा फरार आहे. या तरुणांनी अजून काही लोकांची अशी फसवणूक केली आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.