Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरगद्दारांना कोल्हापूर थारा देणार नाही : अजित पवार

गद्दारांना कोल्हापूर थारा देणार नाही : अजित पवार

आमदार फुटून जातील, याची भीती असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. शिवसेनेतून फुटलेले ४० आमदार पैशांचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरातही काही गद्दार निघाले आहेत; मात्र, कोल्हापूरची जनता या गद्दारांना थारा देणार नाही, अशा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे व्यक्त केला.

आसुर्ले (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात आहेत, असा दावा करत ते म्हणाले, ”बेरोजगारी वाढत आहे. जातीय तेढ निर्माण केली जात आहे;

गद्दारांना जनता थारा देणार नाही

पण कोल्हापूरवासीय याला थारा देणार नाहीत.” ”सरकारने निधी वाटपातील असमानता थांबवली नाही तर न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

श्री. पवार म्हणाले, ”शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यात अधोगती सुरू आहे. प्रकल्प परराज्यात गेल्याने दोन लाख तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महागाई वाढली आहे. घरगुती गॅस, सीएनजी दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. कृषी साहित्य व खतांच्या किमतीने शेतकरी हैराण आहेत. साखर निर्यातीचे धोरण चुकीचे केले आहे.” त्यांनी आरोप केला, की सरकारने शंभर दिवस पूर्ण केले आहेत. तरीही, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विस्तार केला तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते आमदार पुन्हा परत उद्धव ठाकरे गटात जातील, याची भीती आहे. शिंदे-फडणवीस म्हणतील तसेच राज्यात सुरू आहे. उपमुख्यमंत्री सांगतात आणि मुख्यमंत्री ऐकतात, असं महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते. ते आता पाहायला मिळत आहे.

श्री. पवार म्हणाले, ”राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिकतेची शिकवण असणारे कोल्हापूरवासीय याला थारा देणार नाहीत. केवळ सत्तेसाठी शिंदे-फडणवीस सरकार निर्माण झाले आहे. शिंदेंची ही भूमिका योग्य नाही. कोणीही ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेले नाही. शिंदे यांच्यामागे असणारे आमदार निघून गेल्यानंतर त्यांचेही मुख्यमंत्रिपद जाणार आहे. त्यामुळे सत्ता कधीही डोक्‍यात जाऊ नये. शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी दहा कोटी रुपये देऊन एसटीचे बुकिंग केले. हे पैसे आले कोठून? त्यांचे फुटिर आमदार पैशांचा पाऊस पाडत आहेत. लोक हे सर्व पाहत आहेत. कोल्हापूरमध्येही काही गद्दार आहेत. त्यांनाही धडा शिकवला जाणार आहे. शिवसेनेतून जे-जे बाहेर पडले आहेत, ते पुन्हा निवडून आलेले नाहीत, हा इतिहास आहे. लोकांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून निवडून दिले.

शिंदे-फडणवीस सरकार आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव करत आहेत, असा आरोप करून श्री. पवार म्हणाले, ”सत्ताधारी म्हणून काही प्रमाणात ठीक आहे; पण निधीच देणार नाही, ही भावना चुकीची आणि महाराष्ट्राला शोभणारी नाही. महाविकास आघाडी सरकार असताना सत्तेतील, विरोधी आणि अपक्ष आमदारालाही समान निधी वाटप केले जात होते, याचे भान ठेवले पाहिजे. निधी वाटपातील घोळ मिटवला नाही तर न्यायालयात दाद मागू.

या वेळी, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका पाटील, राजू आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरपंच भगवान पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, संतोष धुमाळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -