ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. कानपूरच्या बाबा आनंदेश्वर मंदिरातील (परमट) हा व्हिडिओ असून येथे आरतीच्या वेळी लोकांना भक्तीचे अनोखे रूप अनुभवायला मिळाले. आश्चर्यचकित करणारा हा व्हिडिओ एका बकऱ्याचा आहे, जो आरती सुरु होताच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात देवाला वाकून नमस्कार करत आहे. भाविक देवाचे नामस्मरण करत असताना बकरा देखील देवाची आराधना करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral Video) होत आहे.
कानपूर जिल्ह्यात आनंदेश्वर धाम हे मंदिर प्रसिद्ध आहे. आश्चर्य वाटावं असा हा व्हिडिओ याच मंदिरातील आहे. या मंदिरात दररोज सकाळ आणि संध्याकाळी आरती होत असते. अशात शनिवारी आश्चर्यचकित करणारे हे दृश्य समोर आले. मंदिरात बाबा आनंदेश्वरांची आरती सुरु असताना त्याठिकाणी लोकांच्यामध्ये एक बकरा आला. हा बकरा नुसता आला नाही तर त्याने चक्क गुडघे खाली टेकवून देवाला नमस्कार केला. यावेळी उपस्थित असलेल्या काही भाविकांनी बकऱ्याचा हा व्हिडिओही मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. शिवलिंगासमोर गुडघा टेकवून नमस्कार करणाऱ्या या बकऱ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.