महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकातील विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. कर्णधार ॠतुराज गायकवाडच्या ११४ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने केरळवर ४० धावांनी विजय संपादन केला.
कर्नाटक व सर्व्हिसेस यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राने जम्मू-काश्मीर, मेघालय व आता केरळला हरवण्याची किमया साधली आहे.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारन ॠतुराज गायकवाड याने या स्पर्धेतील आपला शानदार फॉर्म या लढतीत कायम ठेवला. त्याने अवघ्या ६८ चेंडूंमध्ये ८ नेत्रदीपक चौकार व ७ गगनभेदी षटकारांसह ११४ धावांची शतकी खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र – २० षटकांत ४ बाद १६७ धावा (ॠतुराज गायकवाड ११४ – ६८ चेंडू, ८ चौकार, ७ षटकार, पवन शाह ३१, अझीम काझी १४, सिझोमोन जोसेफ ३/१८) विजयी वि. केरळ २० षटकांत ८ बाद १२७ धावा (रोहन कुन्नूमल ५८, सिझोमोन जोसेफ १८, सत्यजीत बच्छाव ३/११, अझीम काझी २/२५).