संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनाची (Corona Virus) दहशत अजूनही कायम आहे. कोरोनाने (Covid-19) गेल्या दोन वर्षात जगभरातील अनेक देशातील नागरिकांचा बळी घेतला आहे. आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्यामुळे जगभरातील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण कोरोनाने काही पाठ सोडली नाही. या कोरोनामुळे पुन्हा टेन्शन वाढले आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी दिला आहे.
डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी माध्यमांशी बोलताना कोरोनाच्या नवीन लाटेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा व्हेरिएंट असणाऱ्या ओमायक्रॉनच्या XBB सबव्हेरियंटसह संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते. कोरोनाचे नवे व्हेरिएंट वैद्यकीयदृष्ट्या अधिक गंभीर असल्याचे सूचित करण्यासंबंधी आतापर्यंत कोणत्याही देशाकडून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर सौम्या स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, ‘ओमायक्रॉनचे जवळपास 300 सबव्हेरिएंट आहेत. यामधील XXB हा व्हेरिएंट सध्या चिंतेचे कारण होणार आहे. हा व्हेरिएंट सर्व देशांची चिंता वाढवणारा आहे. हा व्हेरिएंट तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही मात करु शकतो. त्यामुळे काही देशांमध्ये XXB मुळे कोरोनाची आणखी लाट येऊ शकते. आम्ही BA.5 आणि BA.1 यांच्या मुख्य कारणांचा मागोवा घेत आहोत. हा व्हेरिएंट ज्याप्रमाणे विकसित होत जाईल त्याप्रमाणे तो अधिकाधिक संक्रमित होईल.’, असे त्यांनी सांगितले आहे.
तसंच, कोरोनाचे नवीन सबव्हेरिएंट अती-धोकादायक असल्याचे अद्याप कोणत्याही देशाकडून सांगण्यात आले नाही. कोरोना ही अद्यापही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी सांगितले असल्याची माहिती सौम्या स्वामीनारायण यांनी दिली आहे. त्याचसोबत सध्या जगभरात आठवड्याला 8 ते 9 हजार लोकांच्या मृत्यूची नोंद होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सौम्या स्वामीनारायण यांनी कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, ‘आम्ही कोरोनाची साथ संपली असे सांगितलेले नाही. म्हणजेच आपण सर्वांनी काळजी घ्यायची आणि साधनांचा वापर करण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे वेगवेगळी साधनं आहेत त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसी देखील उपलब्ध आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.