उद्या अर्थात शुक्रवारी कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक सध्या पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चातुर्मासातील व्रतांचा हा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवसाला मोठी एकादशी असेही म्हटले जाते.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीलाही असंख्य भाविका वारीसाठी पंढरपूरात दाखल होत असतात. काही वारीतून पायी चालत तर काही खासगी वाहनांनी, एसटी बसने (ST Bus) असंख्य भाविक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून पंढरपूरात आले आहेत. उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटेच विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाईल. त्यानंतर सामान्य भाविकांसाठी विठ्ठलाचे दर्शन घेण्यास सुरुवात करतील. उद्या शासकीय पूजा झाल्यानंतर 4.30 ते 5 वाजेपर्यंत विठ्ठलाचे दर्शन सुरु होईल. रात्री 11.30 वाजेपर्यंत मंदिर खुले राहिल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. अधिक माहिती पुढीलप्रमाणे-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करतील. यापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री पदी असताना आषाढी एकादशीची पूजा त्यांनी केली होती.
शुक्रवारी पहाटे 2 वाजून 15 मिनीटांनी देवेंद्र फडणवीस यांचं मंदिर परिसरात आगमन होईल.
2.20 मिनिटाला शासकीय महापुजेला सुरुवात होईल.
विठ्ठलाची शासकीय महापूजा 3 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर रुक्मिणीची पूजा 3.30 पर्यंत चालेल.
मानाचे वारकरी महापूजेसाठी निवडले जातील व त्यांचा त्यांचा सत्कार केला जाईल. विठ्ठल मंदिर समितीच्यावतीनं उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस वारकऱ्यांना शुभेच्छा देतील…
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात वैष्णवांचा मेळा जमला आहे. जवळपास 3 ते 4 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाल्याचा अंदाज आहे.
उद्या 7 ते 8 लाख वारकरी पंढरपूरात येतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज आहे.
पंढरपूरात विठ्ठल मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजला आहे.
राज्यभरातून आलेल्या भाविकांना विठ्ठलाचं दर्शन व्यवस्थित व्हावं, याकरिता स्थानिक प्रशासनातर्फे तयारी केली जात आहे.