ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयबेनस्टॉक पॉझिट्रान इलेक्ट्रॉवर्क प्रा. लि. यांच्या वतीने कुस्तीभूषण उप महाराष्ट्रकेसरी पैलवान अमृत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महानभारत केसरी पै. माऊली जमदाडे आणि महाराष्ट्र चॅम्पियन पै. योगेश पवार यांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
आयबेनस्टॉक पॉझीट्रान इलेक्ट्रोवर्क प्रा. लि. यांच्या वतीने आपले संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वेचणारे आणि नवनवीन मल्लांना प्रशिक्षण देऊन कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेले उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आणि शनिवारी (12 नोव्हेंबर) कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात पै. भारत मदने (इंदापूर) विरुध्द पै. बाला रफीक (पुणे) यांच्यात द्वितीय, पै. कौतुक डाफळे (पुणे) विरुध्द पै. विष्णू खोसे (सह्याद्री संकुल पुणे) यांच्यात तृतीय, पै. संतोष दोरवड (शाहुपुरी तालीम कोल्हापूर) विरुध्द महेश वरूटे (मोतीबाग मैदान) यांच्यात चतुर्थ, पै. प्रशांत जगताप (व्यंकोबा मैदान) विरुध्द पै. सतपाल नागटिळक (गंगावेश) यांच्यात पाचव्या, पै. यशवंत कलिंगा (व्यंकोबा मैदान) विरुध्द पै. बाळू अपराध (सांगली) यांच्यात सहाव्या तर पै. इंद्रजीत मगदूम (मोतीबाग) विरुध्द पै. अमोल पाटील (इस्लामपूर) यांच्यात सातव्या क्रमांकाची लढत होईल.
त्याचबरोबर अन्य 75 ते 80 काटा लढतीचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. मैदानाचे उद्घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उद्योगपती महादेवराव महाडीक, बाळदादा गायकवाड, कुस्तीप्रेमी शामराव फडके व डॉ. विलास जोशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. या कुस्ती मैदानात क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.