कोल्हापूर : भाजपने द्वेषाचं राजकारण सुरु केले असून ‘आफताब’ व ‘बिल्कीस बानोत’ प्रकरणात धर्म पाहून न्याय करणारी देवेंद्र फडणवीस व त्यांची टीम महाराष्ट्रात वीष पेरण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महिलांवर कमरेखालचे वार करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या बगलबच्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महाप्रबोधन यात्रेत अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
अंधारे म्हणाल्या, राज्य व देशात भाजपने सगळे संशयाचे वातावरण तयार केले. जातीजातीमध्ये भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजताना महाराष्ट्र अधोगतीला निघाला याचे भान कोणाला नाही. महाराष्ट्रातील सात प्रकल्प बाहेर गेले. गुजरातला ‘ड्रीम’ सिटी बनवण्यासाठी मुंबईला दुबळी करण्याचा डाव आहे. महाराष्ट्राला भकास करुन लाखो तरुणांना बेरोजगार करण्याचे पाप मुख्यमंत्री शिंदे करत आहेत.






