राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच शिर्डी दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान मुख्यमंत्री सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ज्योतिषाकडे ‘हात’ दाखवल्याचं समजतं. त्यावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याच गोष्टीचा धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी ज्योतिषाकडे नाही तर फडणवीसांच्या हातात तुमचे भविष्य आहे, असा खोचक टोला व्यंगचित्रातून लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ‘माझं काय होईल…’ ‘यांच भविष्य माझ्या हाती, अशा आशयाचं व्यंगचित्र काढत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘माझं काय होईल’ असे फडणवीस यांना हात दाखवत विचारत आहेत आणि देवेंद्र फडणवीस ‘यांचं भविष्य माझ्या हाती’ असे बोलत असल्याचे क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्रात दाखवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे तुमचं सरकार अंधश्रद्धेवर किती काळ टिकणार, हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
शिंदे गटाने विरोधकांना सुनावलं…
दुसरीकडे, मुख्यमंत्री सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा मुद्दा विरोधकांनी डोक्यावर घेतला आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
दीपक केसरकर हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत शिर्डी दौऱ्यावर होते. त्यामुळे ते म्हणाले, ईशान्येश्वर मंदिर हे माझे मित्र कॅप्टन खरात यांचं आहे. मंदिर परिसरात गोशाळा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणगी दिली होती. गोशाळेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी ईशान्येश्वर मंदिर आणि गोशाळेच्या कामाची पाहाणी करावी, अशी इच्छा कॅप्टन खरात यांची होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली.






