छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. “राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करतंय का?राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? करत असाल तर उठाव करू,” असा इशारा संभाजीराजे दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !’
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.