कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे.
करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने मंगळवारी पहाटे राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक असलेल्या लेकीने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने आई वडिल मुळापासून हादरून गेले आहेत. दोन मुलींनी आत्महत्या केल्याने सातपुते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वडिल सर्जेराव सातपुते सानिका न उठल्याने पाहण्यासाठी गेले असता सानिका आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आली. सर्जेराव सातपूते यांनी बीडशेडमध्ये जागा घेऊन घर बांधले होते. एक महिन्यांपूर्वीच त्यांनी वास्तूशांती केली होती. मात्र, मुलीने त्याच घरात आत्महत्या केली.
दोन्ही मुलींकडून आत्महत्येने शेवट
कष्टातून संसार फुलवलेल्या सर्जेराव सातपुते यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली आहे. मोठी मुलगी असलेल्या ऋतुजाने सुद्धा आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. तिने विष पिऊन आत्महत्या केली होती. याचा विसर पडत नाही तोवर दुसऱ्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे.