गोवरचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, धुळेसह राज्यातील अनेक शहरात गोवरच्या साथीमुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्षे वयाच्या मुलांना आहे. आतापर्यंत गोवरचे 15 पैकी 14 मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत सुरूवात झालेल्या गोवरची साथ आता राज्यभरात पसरली आहे. मुंबईसह राज्यात नागपूरपाठोपाठ आता नाशिक, संभाजीनगर, धुळे, अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. लहान बालकांसह मोठ्यांना देखील गोवरचा लागण होत आहे. काही रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. मुंबई आणि ठाणे येथे गोवर सेंटर उभारण्यात आली आहेत.
गोवरची लस 99 टक्के सुरक्षित
गोवरची लस 99 टक्के सुरक्षित आहे. कोरोनाच्या तुलनेत गोवरचा धोका कमी आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. गोवरची साथ पसरू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अपवादात्मक परिस्थितीत 18 वर्षांवरील व्यक्तींना याची लागण झाल्याचं आढळून आले आहे. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यविभागाने केले आहे.
नाशिजच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव
नाशिक व मालेगाव अहवाल प्रलंबित आहेत. महापालिका हद्दीत आतापर्यंत गोवरचे 100 हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून, गोवरचा शिरकाव आता ग्रामीण भागात झाला आहे. येवला तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह प्रशासनही सतर्क झाले आहे. या रुग्णाचा सकारात्मक अहवाल येण्यापूर्वीच तो उपचारांनी बरा झाला आहे. येवला तालुक्यातील विखरणी येथील हा रुग्ण आहे. ग्रामीण भागात अंगावर पुरळ व तापाचे रुग्ण शोधले जात आहेत या मोहिमेत वेगवेगळ्या तालुक्यांत 21 संशयित आढळले असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत
पिंपरी-चिंचवडध्ये शिरकाव, 8 जणांना लागण
पिंपरी- चिंचवड शहरात अखेर गोवरचा शिरकाव झाला आहे. कुदळवाडीमध्ये गोवरचे 8 रुग्ण असल्याचे पालिकेने जाहीर केलं आहे. तपासणी साठी मुंबईला पाठवण्यात आलेल्या अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. पाच वर्षे वयोगटापर्यंत लसीकरण तीव्र करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी यापूर्वीच सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. बालकांना ‘अ’ जीवनसत्व डोस देण्याचा कार्यकम ही हाती घेण्यात आलाय..!
गोवरचा धोका कोणाला आहे?
बालकांना लस देण्यात आलेली नाही, अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते.
काय आहेत गोवरची लक्षणे?
– ताप येणे.
– खोकला लागणे.
– घसा दुखणे.
– अंग दुखणे.
– डोळ्यांची जळजळ होणे.
– डोळे लाल होणे.
– 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणे.