ताजी बातमी ऑनलाईन टीम
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची लवकरच सुट्टी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड च्या मुंबईतील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड भारताच्या T20 सेटअपसाठी वेगळा प्रशिक्षक नेमण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय T20 संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीमध्येच जाहीर केला जाऊ शकतो. याचा अर्थ भारत नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.
द्रविडला T20 संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटवले जाऊ शकते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ‘आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविडच्या संघाच्या व्यस्त वेळापत्रकात संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टी-20 क्रिकेटचे व्यस्त कॅलेंडर पाहता संघात बदलाची गरज आहे. मी पुष्टी करू शकतो की भारतीय संघाला लवकरच T20 मध्ये नवीन कोचिंग सेटअप मिळू शकेल.’ विशेष म्हणजे बीसीसीआय कोणाला टी-20 प्रशिक्षक बनवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या पदासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव पुढे आहे.
कॅप्टनपदी हार्दिकची लागणार वर्णी?
बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राने यापूर्वी सांगितले होते की, ‘रोहित शर्मा कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितकडे सध्या खूप काही देण्यासारखे आहे असे आपल्या सर्वांना वाटते. कर्णधारपद सोडल्याने त्याची उंची कमी होत नाही.’ सूत्राने पुढे सांगितले की, ‘आम्हाला आतापासूनच 2024 च्या टी-20 वर्ल्डकपची तयारी करावी लागेल. या भूमिकेसाठी हार्दिक फिट आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याला टी-20 चा कर्णधार म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाईल.’