ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतणार आहे. उत्तर भारतातील हिमाचल, पंजाब आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून, येत्या सोमवारपासून (ता.19) महाराष्ट्रातही पारा घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदौस चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. सध्या दिवसभर उकाडा व रात्री काहीशी थंडी जाणवते. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही झाला. मात्र, आता पुन्हा एकदा कडाक्याची थंडी परतणार आहे.
मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीत वाढ होईल. किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपेक्षा कमी असेल. तसेच दिवसभर अंशतः ढगाळ असलेले आकाश आता पूर्णत: निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम झाला असून, रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषधफवारणी करावी लागत आहे. थंडी वाढल्यास पिकांना फायदा होण्याची आशा आहे.