पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर हॉटेल अमरनजीक चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी पलटी होऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले.तर मुलगी, जावई, नात व स्टॉपवर थांबलेल्या विद्यार्थ्यांसह वाहनातील आणखी एक असे एकूण पाचजण जखमी झाले. हा अपघात काल (मंगळवार) सायंकाळी झाला. सर घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे. गोवा येथून पर्यटन करून परतत असताना स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
शिवदास धर्माजी बोरकर (वय 65) सुरेखा शिवदास बोरकर (वय 60) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मुलगी प्रियांका सुहास ढोके (वय 31), पती सुहास रामदास ढोके (वय 35), मुलगी स्पूर्वा सुहास ढोके (वय 5), दिर नितेश रामदास ढोके (वय 38) सर्वजण रा. लाखनी, केसरवाडा जि. भंडारा व प्रसाद निजगोंडा किल्लेदार (वय 18) रा. चिंचणी ता. चिकोडी हे जखमी झाले. जखमींवर येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अपघातातील जखमी प्रियांका या आपले पती सुहास, दिर नितेश, मुलगी स्पूर्वा यांच्या समवेत आई सुरेखा, वडील शिवदास यांना घेऊन गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. पर्यटन करून ते आपल्या मूळगावी परतत होते. मंगळवारी सायंकाळी त्यांची चारचाकी तवंदी घाट उतारावर आली. यावेळी हॉटेल अमर नजीक वेगात आलेल्या वाहनावरील चालक नितेशचा ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ रस्त्याच्या बाजूला असलेल्या बसस्टॉपला जाऊन धडकली.
यावेळी स्तवनिधी येथील बी. टी. पाटील पॉलिटेक्निकल संस्थेचा विद्यार्थी प्रसाद हा आपल्या गावी बसने जाण्यासाठी थांबला होता. यावेळी स्कार्पिओची धडक बसल्याने तो जखमी झाला. तर चारचाकी पलटी झाल्याने वाहनातील सुरेखा व शिवदास हे पती-पत्नी जागीज ठार झाले. तर प्रियांका नितेश, सुहास, पूर्वा व विद्यार्थी प्रसाद या पाच जणांना गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळतात रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक विष्णू गडकरी यांनी घटनास्थळी धाव घेवून पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांच्यासह हवालदार पी. एम. घस्ती यांनी भेट दिली. तत्पूर्वी जखमींना रस्ते देखभाल कंपनीच्या ॲम्बुलन्सद्वारे उपचारासाठी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालय दाखल केले. यात जखमींपैकी प्रियांका, नितेश व प्रसाद या तिघांना गंभीर दुखापत झाली असून, सुहास व स्पूर्वा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गुर्लहोसूर हे करत आहेत.
या अपघातात हॉटेल अमर नजीक असलेल्या बसस्टॉपवर बी. टी. पाटील पॉलिटेक्निकल स्कूलचे बहुतांशी विद्यार्थी बसने निपाणी अन्य ठिकाणी जाण्यासाठी स्टॉपवर थांबले होते. यावेळी भरधाव येणारी चारचाकी पलटी होत असल्याची जाणीव होताच अनेक विद्यार्थी प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून बाजूला झाले. यावेळी प्रसाद हाही बचावात्मक पवित्रा घेऊन बाजूला होत असतानाच त्याला स्कार्पियोची धडक बसली. जर का घटनास्थळी असलेल्या विद्यार्थ्यांनी बचाव केला नसता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती, केवळ दैव बलवत्तर म्हणून होणारी गंभीर घटना टळल्याची चर्चा घटनास्थळी चालू होती.
स्कार्पिओ अपघातातील सहा जणांनी अपघात होण्यापूर्वी आजरा-निपाणी मार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये बसून केवळ पंधरा मिनिटे अगोदर एकत्रित बसून चहापाणी घेतले होते. यावेळी प्रवासाचे अंतर लांब असल्याने रात्री कोल्हापूर अथवा अन्य निम्म्या टप्प्यावर मुक्काम करण्याचे या सर्वांनी नियोजन केले होते. मात्र काळाने स्कॉर्पिओ वाहनातील वयोवृद्ध सुरेखा व शिवदास या दाम्पत्यावर घाला घालून त्यांना हिरावून नेल्याने अपघातातील जखमी सुरेखा व शिवदास यांची मुलगी प्रियांका यांच्यासह जावई सुहास त्यांचे भाऊ नितेश यांनी एकच आक्रोश केला. जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. यावेळी रुग्णालय परिसरात असलेल्या उपस्थितांची मने हेलावून गेली होती.





