विहिरीतून पाणी काढत असताना शेजारीच बांधलेल्या म्हशीचा अचानक धक्का लागल्याने आजीसमोर नातीचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात घडली. अवघ्या 14 वर्षीय अशाप्रकारे अंत झाल्याने आजीच्या विहिरीवर हंबरडा फोडला. कार्तिकीच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आजरा शहरातील भारत नगरमधील कार्तिकी सचिन सुतार (वय 14) या शालेय विद्यार्थिनीचा माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (12 मार्च) चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकी आजीसह शेतातील विहिरीतील पाणी काढून म्हैस धुवत होती. सोबत असलेली आजी बाजूला शेतात शेळ्या चारत होती. यावेळी शेजारीच असलेल्या झाडाला बांधलेली म्हैस अचानक फिरल्याने कार्तिकी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोर झाली. नात पडताच आजीने आरडाओरड सुरु केला, पण शेतामध्ये कोणीच नव्हते. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून आजरा पोलिसांना माहिती दिली.