ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ठाकरे यांनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असा इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात अशांना बोलण्याचा काय अधिकार आहे.
जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही, असा इशारा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
ज्या दिवशी बोलणं सुरु करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं. त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात, मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते जितक्या खालच्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी पण नागपूरचा आहे. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, त्याचं उत्तर त्यांना जनता देईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.