Wednesday, December 25, 2024
Homeब्रेकिंगचार जिल्हे पावसाच्या रडारवर, अतिवृष्टीचा इशारा!

चार जिल्हे पावसाच्या रडारवर, अतिवृष्टीचा इशारा!

गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहे. पहिल्याच पावसात मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांची दाणादाण उडाली आहे. मुंबई, ठाणेकरांची ही तारांबळ उडालेली असतानाच हवामान खात्याने तोंडचं पाणी पळवणारी बातमी दिली आहे. हवामान खात्याने चार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह परिसरात आजही मुसळधार पाऊस पडू शकतो.

राज्यातला गेल्या 7 दिवसातला पाऊस चांगला झाला आहे. गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. IMD च्या अंदाज नुसार राज्यात येत्या काही दिवस पाऊस सक्रिय राहील. राज्यात आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईसह उपनगरात काल दिवसभर पाऊस पडल्यानंतर आज सकाळपासून पाऊस थांबला होता. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. कालच्या पावसानंतर मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पण आज प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारीही सतर्क झाले आहेत. अंधेरीसह उपनगरात आता पाऊस थांबला आहे. पावसामुळे बंद झालेला अंधेरीचा भुयारी मार्ग सध्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कालच्या पावसाने पाणी तुंबल्याने हा भुयारी मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला होता.

मुंबईच्या भायखळ्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाड पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री भायखळा इंदू ऑइल मिल कंपाउंडमध्ये पाच ते सहा जण झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास एक झाड खाली पडल्यामुळे रहमान खान वय 22 वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदार रिजवान खान 20 वर्ष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जे जे रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात म्हणावा तसा जोरदार पाऊस झालेला नाही. शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -