मुलीचं खालच्या जातीच्या मुलावर प्रेम असल्याचे समजल्यानंतर बापानेच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या कोलारमधील बोदागुरकी गावात मंगळवारी घडली. आपल्या प्रेयसीची हत्या झाल्याचे समजताच प्रियकरानेही आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
२० वर्षांची कीर्ती ही तरुणी पदवीचे शिक्षण घेत होती. कीर्तीचे त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय गंगाधरवर प्रेम होते, पण गंगाधर खालच्या जातीचा असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना ही बाब पसंत नव्हती. यावरून कीर्तीच्या घरी मोठा वाद झाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान कीर्तीची हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली. ही हत्या कीर्तीच्या वडिलांनीच केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
खालच्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंधांना मुलीचे वडील कृष्णमूर्तीचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कृष्णमूर्ती कीर्तीचे गंगाधरशी लग्न लावून देण्यास तयारही झाला होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी कीर्तीच्या या प्रेमसंबंधांमुळे घरात मोठा वाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कीर्तीची हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णमूर्तीला अटक केली असून, त्याची सखोल चौकशी केली जात आहे.
गंगाधरला कीर्तीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला धीर देण्यासाठी बाइकवरून बाहेर घेऊन जात असताना त्याने मध्येच रस्त्यात भावाला बाइक थांबवायला सांगितली. खाली उतरताच गंगाधरने बाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.