Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकागलमध्ये समझोता एक्स्प्रेस धावणार का?

कागलमध्ये समझोता एक्स्प्रेस धावणार का?

राज्यातील राजकीय भूकंपानंतर कागलमधील सर्वच राजकीय नेते एकाच विचारधारेत आल्याने येथे ‘समझोता एक्स्प्रेस’ धावणार का? विशेष करून हसन मुश्रीफ व भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात राजकीय समन्वय होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.


खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे तिथे भाजपशी युती आलीच. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे अगोदरपासूनच भाजपमध्ये आहेत. आता अजित पवार यांच्या बंडात सहभागी होत हसन मुश्रीफ पण मंत्री झाले. म्हणजेच आता तालुक्यात हे तिन्ही नेते एकाच राजकीय विचारधारेमध्ये आले आहेत.


माजी आमदार संजय घाटगे हे शिवसेना ठाकरे गटात आहेत; पण ते तालुक्यात मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षीय लेबल वेगळे असले, तरी ते आता मुश्रीफ यांच्यासोबतच आहेत. ही सर्व समीकरणे पाहता तालुक्यात राजकीय विरोध मावळून समझोता एक्स्प्रेस धावणार का, हा खरा प्रश्न आहे. तालुक्यात आता राजकीय संघर्ष विशेष करून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यातच आहे. इतर प्रत्येकाची खूप सावध भूमिका आहे. मुश्रीफ व घाटगे यांचे विधानसभा हेच लक्ष्य आहे.

त्यामुळे विकासकामांची उद्घाटने ते सभा-समारंभ यामध्ये हे नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत असतात. आता बदलत्या समीकरणामुळे तालुक्यातील या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळणार का, याचे कुतूहल आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी युतीतून संजय घाटगे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता नेमके काय होणार, हे लवकरच कार्यक्रम व त्यातील भाषणे यावरून स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -