इचलकरंजी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने मंजूर केलेली सुळकूड उद्भव दुधगंगा योजना संदर्भात शासन स्तरावर तातडीने बैठक घेण्यात यावी आणि योजना तातडीने कार्यान्वित करण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक लावण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या आहेत. इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी कागल तालुक्यातील सुळकुड उद्भव दुधगंगा नदी येथून पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.
पण, या योजनेस शासनाची मान्यता मिळूनही स्थानिक राजकारणामुळे योजनेचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यामुळे इचलकरंजीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या सुळकूड पाणी योजना प्रश्नी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे उपस्थितीत कागल तालुक्यातील प्रमुख नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, राजे समरजीत घाटगे, संजय घाटगे यांचेसह इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी व संबंधितांची एकत्रित बैठक तात्काळ आयोजित करून इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावावा, असे आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.