राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार याची २५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहे. यासाठी इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये आज बुधवार ता. २३ रोजी सायंकाळी ६ वाजता आमदार रोहित पवार आणि युवा नेते रोहित पाटील हे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालयात इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि राष्ट्रवादीचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांनी पत्रकार बैठकीत दिली..
राजकीय घडामोडीनंतर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात पवार यांची जाहीर सभा होत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खासदार शरद पवार यांचे कावळा नाका येथे ३० फुटाचा पुष्पहार घालून स्वागत केले जाणार आहे. तर आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील हे बुधवारी इचलकरंजीत येत असून ते इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ या तीन विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी मेळाव्याच्या माध्यमातुन संवाद साधणार आहेत. तत्पुर्वी त्यांचे पंचगंगा नदीतीर येथून कार्यालयापर्यंत रॅलीने स्वागत करण्यात येणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक उदयसिंग पाटील, मंगेश कांबुरे, राजु खोत, नितीन कोकणे, प्रियदर्शिनी बेडगे, अभिजीत रवंदे, दशरथ माने, नागेश शेजाळे, गुड्ड शेख, आनंदा बाझे, मच्छिंद्र नगारे आदी उपस्थित होते.