शिव, शाहू, फुले यांचे विचार जपणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या जिल्ह्याने अल्पसंख्यांक समाजातील चेहरा म्हणून राजकारणात हसन मुश्रीफ यांना यांना कायमच झुकते माप दिले, ज्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यांनीच अजित पवार यांना आज माथ पक्षात मोठी फूट पाडण्यास साथ दिली. पक्षनेतृत्वाला मोठा धक्का दिला. त्याच मुश्रीफ यांच्याविषयी शरद पवार हे कोल्हापुरातील जाहीर सभेत काय बोलणार? कागल विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला कोणता संदेश देणार? याबद्दल मोठी उत्कंठा लागून राहिली आहे.
आज शुक्रवार ता. २५ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक दसरा चौकात ही जाहीर सभा होणार आहे.
पक्ष फटीनंतर शरद पवार यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी इतर आमदार सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक केल्यानंतर त्यांच्याविषयी शरद पवार यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीत. कारवाईच्या भीतीने काही मंडळी आम्हाला सोडून गेली आहेत. नंतर त्यांना पश्चातापच होणार आहे, अशी सौम्य शब्दातील प्रतिक्रिया त्यांनी यापूर्वी दिलेली आहे. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी पहिली सभा घेतली.
तुम्हाला मी चुकीचा माणूस दिला, असे सांगून त्यांनी येवला मतदारसंघातील मतदारांची जाहीर माफी मागितली तेव्हा हेच छगन भुजबळ म्हणाले होते की किती ठिकाणी माफी मागत फिरणार? एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये आमचेही मोठे योगदान आहे, त्यामुळेच आम्हाला पदे मिळाली असे एका प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे आम्हाला पदे दिली म्हणून काही उपकार केले नाहीत, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडसत्र सुरू केल्यानंतर त्यांचाही राजकीय प्रवास संपण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांनी अजित पवार यांच्या बंडाला साथ दिली आणि आज ते महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.
कागल विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपले मनापासून समर्थन दिले नाही तर त्यांनी हसन मुश्रीफ यांनाच मोठे समर्थन दिले. त्यांच्यामुळेच हसन मुश्रीफ हे मंत्री झाले. अल्पसंख्यांक समाजातील एक चेहरा म्हणून शरद पवार यांनी त्यांना लॉन्च केले होते. आता त्यांच्याबद्दल शरद पवार हे कोल्हापूरच्या जाहीर सभेत काय बोलणार? त्यांच्यावर हल्लाबोल करणार काय? याबद्दल कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. शरद पवार यांचे आणखी एक जवळचे सहकारी आणि महायुतीमध्ये सध्या असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांना एक हाती सत्ता संपादन करता आली नाही.
६० ते ७० आमदार इतकीच मर्यादित त्यांची ताकद राहिली, अशी टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात शरद पवार समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी माफीचा वळसा घेतला. पण अशाच प्रकारचे वक्तव्य अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकत्यांच्या मेळाव्यात केले होते. तेव्हा मात्र त्यांच्या विरोधात कार्यकत्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली नाही. पक्ष फुटी नंतर अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय काढले त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संतप्त झालेला दिसला नाही.