आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणी कमी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यात खरीप हंगामासाठी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार, दुष्काळी भागात तातडीने मदत पोहोचवण्यासाठी केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
मुख्य म्हणजे, राज्यांतील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून त्याठिकाणी सवलती पोहोचवण्यात याव्यात असे निर्देश आज एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यानुसार दुसऱ्या टप्प्यात इतर तालुक्यांना मदत पोहोचवण्याबाबत निर्देश देण्यात येतील.
दरम्यान, आजच्या बैठकीमध्ये मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये, दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार, अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. तसेच, यावर्षी पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट आली असल्यामुळे रब्बी पेरण्या संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.